
साहिल वाकोडे प्रकरणी CBI चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा — वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
योगेश रामटेके (विशेष प्रतिनिधी )
चंद्रपूर, दि. २४ सप्टेंबर २०२६ :
IIT मुंबई येथे शिक्षण घेणारे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी विद्यार्थी साहिल वाकोडे यांना कथित जातीय भेदभाव व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याच्या प्रकरणाची CBI मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित कुलगुरू, प्राध्यापक व संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसाठी आज, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय व शैक्षणिक संस्थेत प्रभावी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, भेदभाव व छळापासून संरक्षण मिळावे तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच वंचित बहुजन महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना समान, सुरक्षित आणि भेदभावमुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली.



