
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने झाडाला जोरदार धडक; तिघांना गडचिरोलीला रेफर
कोरची-ढासगड-चीचगड मार्गावरील बोडेनाजवळ रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण दुचाकी अपघात घडला. तीव्र वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या झाडाला दुचाकीची जबरदस्त धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील तिघेजण तब्बल १२ ते १३ फूट अंतरावर फेकले गेले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या अपघातात देवकुमार बघवा (वय १८) याचा डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला असून सुखदास बोदी (वय ३७) याचा डावा पाय मोडला आहे. दुचाकी चालक टुनेश्वर टेकाम (वय १९) हा किरकोळ जखमी झाला. तिघेही कुरखेडा तालुक्यातील डिप्राटोला येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही एमएच ३३ एई ४३९५ क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी ढासगड या पर्यटनस्थळी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात बोडेनाजवळील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक बसली.
अपघाताची माहिती मिळताच कोरची येथील भाजप नेते नसरुद्दीन भामानी, प्रशांत कराडे तसेच छत्रपती बांगरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना सुरक्षित स्थळी हलवून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे दाखल करण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तत्परतेने जखमींना स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत हलवत पुढील उपचारासाठी रवाना केले. अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित बुद्धे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सुखदास बोदी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. अधिक उपचारांची गरज लक्षात घेता तिघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

