
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
पावसाचा गैरफायदा घेत 8 किमी मार्गावर घडली घटना; परिसरात संताप
कोरची तालुक्यात अल्पवयीन मुलीशी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फोर व्हीलर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.30 ते रात्री 9.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी मुलगी ही मामाच्या घरी धान रोवणीच्या कामासाठी जात असताना कोरचाटोला ते बोरेकसा दरम्यान पावसामुळे रस्त्यावर अडचण निर्माण झाली होती. याच वेळी आरोपी ओमप्रकाश शामसिंग उईके (वय 42, रा. बीहटे खुर्द, ता. कोरची) याने मुलीला आपल्या चारचाकी वाहनात बसण्यास सांगितले. मुलीचा मामा दुचाकीवरून मागे येत होता.
दरम्यान, संधी साधून आरोपीने वाहनातच मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार मामाला सांगण्याची भीती दाखवताच आरोपीने तिला तिच्या मामाच्या घरी सोडून दिले.
घटनेनंतर पीडित मुलीने धाडस करून तक्रार दाखल केली. दि. 2 ऑगस्ट रोजी पहाटे 2.17 वाजता कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. अप.क्र. 95/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत.

