
प्रलय सहारे
भेंडाळा प्रतिनिधी :
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहुर्ली येथील शेतकरी मंथन विलास चल्लीरवार यांच्या शेतातील उभे असलेले धान (पराठी) पीक पुराच्या पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहे.

शेतात अनेक दिवस पाणी साचून राहिल्यामुळे धान पिकाची वाढ खुंटली असून पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हंगामातील सर्व मेहनत पाण्यात गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीची प्रशासनाने तातडीने पंचनामे करून वस्तुनिष्ठ पाहणी करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत आणि योग्य भरपाई त्वरित जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, अशाच प्रकारचे नुकसान इतर शेतकऱ्यांनाही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

