
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि. २ जूलै :-चामोर्शी शहराची वाढती लोकसंख्या, वाहतुकीची वाढती वर्दळ आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील प्रमुख चौकाचौकात शाळा-महाविद्यालय परिसर तसेच राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व वाहतूक सिग्नल यंत्रणा तातडीने उभारण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज नैताम यांनी केली आहे.
चामोर्शी हा गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येचा तालुका असून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे.

तसेच आष्टी टी-पॉईंट, हत्ती गेट परिसर, व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुख्य बस थांबा, राष्ट्रीय महामार्ग तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्याची गरज असल्याचे नमूद करून शहरात आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, तसेच कोणतीही अप्रिय घटना घडल्यास तपास जलदगतीने करून संबंधितांवर कारवाई करणे सोपे जाईल. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ होईल, असे सूरज नैताम यांनी निवेदनातून स्पष्ट करत
सदर मागण्या सोडवण्यात यावे यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे यासाठी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागणीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी शिवसेना (शिंदे गट) चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज नैताम अपेक्षा व्यक्त केली.

