
जिल्हा प्रतिनिधी | नितेश गट्टीवार
गडचिरोली/आरमोरी | दि. १ ऑगस्ट
आरमोरी–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगावजवळ पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे सलग ३ ते ४ अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातांमध्ये एक मालवाहू ट्रकही रस्त्यावर पलटी झाल्याने या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती पाहून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी आमदार मसराम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांच्याशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून घटनास्थळावरील खड्ड्यांची वास्तविक परिस्थिती दाखवली. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे हे खड्डे त्वरित बुजवून रस्ता सुरक्षित करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
यासोबतच देसाईगंज–कोरची, देसाईगंज–गडचिरोली आणि गडचिरोली–धानोरा या संपूर्ण मार्गावरील सर्व खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले.
या पाहणीवेळी धनपाल मिसार सर, खेमराज सामृतवार, पोलीस पाटील वामन राऊत, मधुकर राऊत, राजू ढोरे, हरीश राऊत आदी उपस्थित होते.
“जनतेच्या जीवाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. सुरक्षित रस्ते हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत,” अशी ठाम भूमिका आमदार रामदास मसराम यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

