
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/भामरागड,दि.३१ जूलै:
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना, लाहेरी येथील गंभीर आजारी नागरिकाला गडचिरोली पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून वेळेत उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संबंधित नागरिकाचा जीव वाचल्याने या बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी (वय 35) यांची विषबाधा किंवा सर्पदंशामुळे प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्व प्रमुख रस्ते बंद झाल्याने त्यांना रुग्णालयात नेणे अशक्य झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीने समन्वय साधत ‘पवन हंस’ हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले.
हेलिकॉप्टरद्वारे श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणण्यात आले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या बचाव मोहिमेत भामरागड येथील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, तसेच पवनहंस हेलिकॉप्टरचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पूर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा. वेळेत योग्य उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.
पूरग्रस्त भागातील या यशस्वी हवाई बचाव मोहिमेमुळे गडचिरोली पोलिसांची तत्परता आणि आपत्कालीन व्यवस्थापन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

