
प्रतिनिधी | न्यूज जागर
चामोर्शी, दि. २६ : चामोर्शी पोलिसांनी कुणघाडा फाटा परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या सलग कारवाईत अवैध देशी दारू वाहतूक व साठा प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण १,९०० देशी दारूच्या बाटल्या तसेच टाटा नेक्सान कार असा मिळून ६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिल्या कारवाईत पोलिसांनी २५ जून रोजी रात्री कुणघाडा फाटा येथे संशयित टाटा नेक्सान (क्र. MH-33-AD-3450) अडवून तपासणी केली. वाहनातून रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० एमएलच्या ६०० सिलबंद बाटल्या (किंमत ४८ हजार रुपये) आढळून आल्या. याप्रकरणी राजेंद्र सपन मंडल (वय २७, रा. कुणघाडा रै.) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ५ लाख रुपयांची टाटा नेक्सान कार जप्त करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईत २६ जून रोजी पहाटे रात्रगस्तीदरम्यान कुणघाडा फाटा परिसरातील शेतात छापा टाकून रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० एमएलच्या १,३०० सिलबंद बाटल्या (किंमत १ लाख ४ हजार रुपये) जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विजय दिलीप जुवारे (वय २६, रा. मुरखळा माल) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही कारवाया चामोर्शी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केल्या. पुढील तपास पोउपनि शहू दंडे करीत असून, कारवाई मा. पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

