
वर्धा – आर्वी पंचायत समितीत घडलेल्या मनरेगा निधी गिळंकृत प्रकरणी २६ रोजी फौजदारी कारवाई करण्यात आली. आर्वी पोलिसांची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एका महिलेला ताब्यात घेत चौकशीही सुरू केल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.
ऑनलाईन प्रणाली हाताळण्यात तरबेज असलेल्या आर्वी पंचायत समितीतील मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांनी स्वत:ला व निकटवर्तीयांना मोठा आर्थिक लाभ मिळून देण्यासाठी शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत सुरूवातीला आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांनी प्राथमिक चौकशी केली. याच चौकशीत २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे पुढे आले होते. तर संबंधित रक्कम प्रणाली कसर यांनी भरल्यावर त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी बडतर्फ केले. शिवाय या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली. याच समितीने आपला अहवाल जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सादर केला.
सखोल चौकशीत जवळपास ७० लाखांचा शासकीय निधी गिळंकृत करण्यात आल्याचे पुढे आल्याने फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना पराग सोमन यांनी आर्वीच्या गटविकास अधिकार्यांना दिल्या. त्यांनी आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरही हे प्रकरण बराच काळ चौकशीत ठेवण्यात आले होते. आवश्यक कागदपत्रं मिळाल्यानंतर २६ रोजी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या प्रकरणाशी संबंधित एका महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आर्वी पोलिसांनी आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पाचारण केले. पण, दुपारी २.३० वाजेपर्यंत त्या आर्वी पोलिस ठाण्यात पोहोचल्या नसल्याची माहिती आहे.

आर्वी पंचायत समितीत घडलेल्या मनरेगाच्या शासकीय निधीचा अपहार प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले. प्राथमिक चौकशीत शासकीय निधीच्या अपहाराबाबत तत्थ आढळल्यानंतर सखोल चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात ७० लाख व त्यापेक्षा अधिकच्या शासकीय निधीच्या अफरातफर दिसून येत असल्याने हे प्रकरण फौजदारी कारवाईसाठी आर्वी पोलिसांकडे वळते करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी दिली.

