
अमरावती – नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल नाट्यमय घडामोडीनंतर अर्ज माघारीवर अखेर पडदा पडला. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेने महायुतीचे विसर्जन करून एकमेकांसमोरच आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.
चिखलदरा नगरपालिकेत दोन दिवसांपुर्वीच मोठी उलथापालथ होऊन राजकीय समीकरणे बदलली. चिखलदरा येथे भाजपकडून फटका बसूनही राष्ट्रवादी अजित पवार गटाने दर्यापुरात भाजपसोबत युती केली. दुसरीकडे, महाविकास आघाडी देखील दुभंगल्याचे दिसून आले आहे.
दर्यापूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीसोबत युती केली असली, तरी शिंदे गटाने भाजपच्या विरोधात उमेदवार दिला आहे. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार नलिनी भारसाकळे यांच्या विरोधात शिंदे सेनेने प्रदीप मलिये यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट देखील रिंगणात असल्याने बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत.
अंजनगाव सुर्जी नगरपालिकेतही महायुतीत फूट पडली आहे. भाजप आणि शिंदे गट हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शेंदूरजनाघाटमध्ये भाजप आणि शिंदे गट समोरा समोर आले आहेत. अचलपूरमध्ये देखील भाजपसमोर शिंदे सेनेच्या उमेदवाराचे आव्हान आहे. अचलपूरमध्ये भाजपच्या रुपाली माथने यांच्या विरोधात शिंदे गटाच्या रेखा गड्रेल या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपालिकेत काँग्रेस, प्रहार, एमआयएम सह अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. या ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र आहे.

चांदूरबाजार नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यातही भाजपच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाने आव्हान उभे केले आहे. काँग्रेस आणि प्रहारने या ठिकाणी चूरस निर्माण केली आहे.
धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर या नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. धामणगावात भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे-अडसड या रिंगणात आहेत. अंजनगाव सुर्जीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे उमेदवार आहेत. तर दर्यापूरमध्ये अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे यांच्यासमोर त्यांच्यात जाऊ काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांचे आव्हान आहे.
काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख सामना असला, तरी काही ठिकाणी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट तसेच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचाही प्रभाव असल्याने ही निवडणूक रंगतदार बनली आहे. धामणगावात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. चिखलदरा येथे तिरंगी लढत आहे.

