
बुलढाणा – जिल्ह्यातील ११ पालिकांच्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त महायुती मधील भरभक्कम ऐक्याची पोलखोल झाली आहे. युतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन मित्रपक्ष एकाही पालिकेत एकत्र लढताना दिसत नाही.
भाजपाने अजितदादा गटाला काही ठिकाणी सोबत घेतले मात्र शिंदे सेनेला सोबत घेण्याचे कटाक्षाने टाळले आहे. यापरिणामी हे मित्रपक्ष स्थानिक लढतीत मात्र वैऱ्यासारखे लढत असल्याचे चित्र आहे.
भाजपाने प्रारंभीपासून एकला चलो रे ची भूमिका घेतली. पक्षाने स्वबळाची भूमिका घेत जिल्ह्यात ताकद असलेल्या व महत्वाकांशी शिंदेसेनेच्या युतीच्या प्रस्तावाची गंभीर दखल घेतली नाही. याउलट जिल्ह्यात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ वगळता फारशी ताकद नसलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेणे पसंत केले. वरिष्ठ पातळीप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा शिंदे गटाला डावलण्याचे धोरण अवलंबण्यात आले.

यामुळे बुलढाणा पालिकेत भाजपा व अजित पवार गटाने एकत्र येऊन शिंदे गटाला आव्हान दिले आहे. सदस्य पदाच्या लढतीत मात्र काही प्रभागात हे तिन्ही मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असल्याचे मजेदार चित्र आहे.
मंत्र्यांच्या गृहक्षेत्रातही आमने सामने
भाजपा व शिंदे सेना मधील संबंध इतके ताणले गेले आहे की शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह क्षेत्रातील मेहकर व लोणार पालिकात देखील भाजप सेनेची युती होऊ शकली नाही. हे दोन्ही मित्र वैऱ्यासारखे लढत आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या क्षेत्रातील खामगाव पालिकेत भाजपाने अजितदादाना सोबत घेण्याचे टाळले. शिंदे सेना एकाकी पडली आहे.
शिंदे व पवार एकत्र
देऊळगाव राजा पालिकेत शिंदे सेनेचे माजी आमदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे एकत्र आले. अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांना पराभूत करण्यासाठी हे आघाडी करून एकत्र आलेत. भाजपला तिथे गौण स्थान मिळाले आहे. जळगाव, खामगाव, मलकापूर, आणि नांदुरा पालिकेत भाजपा जवळपास स्वबळावर लढत आहे. मित्र पक्षांना फारसे महत्व देण्यात आले नाहीये.
शेगावमध्ये भाजप व शिंदेसेना एकत्र
सिंदखेडाराजात अजित पवार गट भाजप सोबत असून शिंदे गट विरोधात लढत आहे. यामुळे पालिका लढतीत युतीतील कलह, विरोध, असमन्वय उफाळून आला आहे

