
चंद्रपूर – महायुती व महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील दहा पैकी आठ नगर पालिका निवडणुकीत तिरंगी व दुरंगी लढत होत आहे. राजुरा व गडचांदुर या दोन पालिकेत भाजपात तर बल्लारपूर येथे काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आहे.दरम्यान कार्यकर्त्याची ही निवडणूक असली तरी भाजप व काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, घुग्घूस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मुल, नागभीड या १० नगर पालिका व भिसी या एका नगर पंचायतामध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी दाखल एकूण ९१ उमेदवारांपैकी १३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या लढतीत ७८ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदासाठी १ हजार २७५ उमेदवार लढतीत आहे.
भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या चार पक्षांनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीकडे सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. उमेदवारांच्या माघारीनंतरही गडचांदूर, राजूरा व बल्लारपूर या तीन नगर पालिकेत अनुक्रमे भाजप व काँग्रेस पक्षात बंडखोरी कायम आहे.
गडचांदूरमध्ये काँग्रेसचे सचिन भोयर, भाजपचे अरविंद डोहे या दोन प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत भाजपाचे बंडखोर निलेश ताजणे तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात कायम आहेत. त्यामुळे गडचांदूरमध्ये भाजपाला येथे बंडखोरीचा फटका बसणार हे उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरुण निमजे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसेल. बल्लारपूरमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी कायम आहे.

काँग्रेसचे घनश्याम मुलचंदानी यांची सून चैताली मुलचंदानी हिला शिवसेना उबाठा कडून उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याचा फटका काँग्रेस उमेदवार अल्का अनिल वाढई हिला बसनार आहे. येथे भाजपच्या रेणुका दुधे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. तर इतरही छोटे पक्ष निवडणूक लढवत असल्याने काँग्रेस साठी अडचणीचे झाले आहे.राजूरा नगर पालिकेत भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी कायम ठेवली असल्याने भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस – शेतकरी संघटना आघाडीचे अरुण धोटे व भाजपचे अरविंद अदानिया यांच्यात लढत आहे. येथे युतीचा फायदा काँग्रेसला होणार आहे.
भद्रावती नगर पालिकेत भाजपातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे संघ स्वयंसेवक सुनील नामोजवार, भाजपचे स्वयंसेवक अनिल धानोरकर, शिवसेना शिंदे पक्षाचे प्रफुल चटकी व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नंदू पढल अशी चौरंगी लढत आहे. ब्रम्हपुरी काँग्रेसचे योगेश मिसार व भाजपचे बालबुधे अशी दुहेरी लढत आहे. मात्र भाजपने विलास विखार यांना उमेदवारी न दिल्याने भाजपचा एक गट नाराज आहे. घुग्घूस येथे भाजपच्या पूजा दुर्गम, काँग्रेसच्या दीप्ती सोनटक्के अशी दुहेरी लढत आहे. येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शोभा ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे.
चिमूर नगर पालिका मध्ये काँग्रेसच्या नंदेश्वर व भाजपच्या गीता लिंगायत अशी थेट लढत आहे. मुल पालिकेत भाजपातून काँग्रेस पक्षात गेलेल्या एकता समर्थ व भाजपच्या प्रा. किरण कापगते यांच्यात थेट लढत आहे. नागभीड येथे काँग्रेस स्मिता खापर्डे व भाजपचे लोमेश दुधे अशी लढत आहे. तर भिसी या एकमेव नगर पंचायत मधे काँग्रेसचे आकाश पाटील व भाजपचे अतुल पावरे यांच्यात थेट लढत आहे. वरोरा नगर पालिकेत काँग्रेसच्या अर्चना ठाकरे, भाजपच्या माया राजुरकर, शिवसेना शिंदे पक्षाच्या ज्योती नितीन मते, तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सोनम नाशिककर अशी लढत आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे रंजना पारशिवे रिंगणात आहे.
विशेष म्हणजे काही पालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फटका समविचारी पक्षांना बसण्याची शक्यता आहे. मूल व बल्लारपूर पालिकेत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, घुघुस आमदार किशोर जोरगेवार, राजुरा व गडचांदूर येथे आमदार देवराव भोंगळे तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, ब्रम्हपुरी, नागभीड व चिमूर येथे काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, वरोरा व भद्रावती येथे आमदार करण देवतळे तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील काही नगर पालिकेत दुरंगी, तिरंगी तर कुठे बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुती मधील घटक पक्षांमध्ये युती न झाल्याने त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत तर महाविकास आघाडीमध्ये देखील काही ठिकाणी आघाडी न झाल्याने त्यांनी देखील स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुरंगी लढतीची दाट शक्यता आहे. मताचे विभाजन होवू नये यासाठी काहींची मनधरणी केल्या जात आहे.

