
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
कोरची. दि. 15/10/25
या देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लोक मावसभाऊ आहेत. या समाजावर आदि कालापासून अन्याय अत्याचार होत आला आहे. त्यांच्यावर नेहमीच अत्याचार झाला आहे. त्यामुळे एससी आणि एसटी समाज हे मावसभाऊ आहेत. त्यामुळे कुणावरही अन्याय झाला तरी, तुम्ही सोबतीने प्रतिकार करा. अशाप्रकारे मार्गदर्शन कोरची तालुक्यातील माधे या गावात झालेल्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात परमानंद दादा मेश्राम यांनी केले.
पंचशील तत्व सिद्धांत नवयुवक कमेटी क्षेत्र शाखा कोटगुल च्या वतीने माधे येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे, मुंबई येथील सामाजिक चळवळीचे नेते परमानंद दादा मेश्राम, गडचिरोली येथील समाज कल्याण विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. सचिन मडावी, अॅड. उमेश वालदे, सदाराम नुरूटी, बौद्ध समाजाचे तालुका अध्यक्ष अशोक कराडे, शालीकराम कराडे, परमेश्वर लोहंबरे, अनिल उर्फ क्रांती केरामी, मनोज अग्रवाल, श्रावण मातलाम, मुकेश नरोटे ओमराव टेंभुर्णे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
परमानंद मेश्राम पुढे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली, ती घटना सर्वसमावेशक आहे.या देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांचे हीत जोपासणारी आहे. बाबासाहेबांचा आंबेडकरवाद जोपर्यंत समजून घेणार नाही, तोपर्यंत, कोणत्याच समाजाची प्रगती होणार नाही असे म्हटले. आजही या परिसरात आदिवासी समाज , बौद्ध समाजाच्या लोकांचा तिरस्कार करतो, कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाही. विटाळ मानतो. आदिवासी समाज जर असे करू शकतात, तर उच्च वर्णीय लोक काय करतील हे कल्पनेच्या बाहेर आहे. आज सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च न्यायाधिस सुरक्षित नाही, आयपीएस अधिकारी सुरक्षित नाही, तर सामान्य मानुस सुरक्षित राहुच शकत नाही.हे षडयंत्र आहे. लोकांनी हे समजून घ्यावे. हा अत्याचार नुसत्या आंबेडकरी समाजावरच नाही तर या देशातील आदिवासी, ओबीसी समाजावर सुद्धा आहे. त्यामुळे सर्वांनी वेळ आणि काळ ओळखा. असे ते यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार क्रीष्णा गजबे, अॅड. उमेश वालदे यांचेही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश उमरेड यांनी केले,सूत्रसंचालन हिरामण मेश्राम यांनी तर आभार अमीत टेंभुर्णे यांनी मानले.


