
‘या’ जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर तब्बल २० गावं यादीतून गायब ;
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार नेमका कुठे घडलाय ते जाणून घ्या.
अमरावती- ‘व्होटचोरी’ च्या मुद्द्यावरून राज्यात चर्चा सुरू असताना, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल २० गावांची नावं मतदार यादीतून (Voter List) गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासनाच्या (Election commission) कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

नेमका काय आहे घोळ?
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव हे असेच एक गाव आहे, जिथे जवळपास अडीच हजार मतदार असताना हे संपूर्ण गावच मतदार यादीतून वगळले गेले आहे. गावातील सरपंच शशिकांत मंगळे यांच्या सर्वप्रथम हा घोळ लक्षात आला आणि त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली.
गायब झालेल्या गावांची यादी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तीन गणांमधील २० गावांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत:
खानमपूर पांढरी गण: टाकरखेडा मोरे, धनेगांव, अहमदपूर.
कापूस तळणी गण: रौदळपूर, पोही, रत्नापूर, जवळा बुद्रुक, जवळा खुर्द, औरंगपूर, सैदापूर.
चौसाळा आणि भंडाराज गण: डोंगरगाव (तुरखेड), मलकापूर बुद्रुक, आडगाव खाडे, नवापूर, मासमापूर, मूर्तिजापूर घोगर्डा, हसनापूर पार्डी, शिरजगाव, कारला, निमखेड आडे, जवर्डी, धुडकी.
प्रशासनाची सारवासारव; विरोधकांकडून टीका
तालुक्यातील मतदार यादीतील हा घोळ राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘ही प्रारूप मतदार यादी होती,’ असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.
दुसरीकडे, विरोधकांनी प्रशासनाच्या या ‘अजब’ कारभारावर जोरदार टीका केली आहे. “लोकशाहीतून हुकूमशाही चालवण्याचा हा प्रयत्न आहे,” असा घणाघात विरोधकांनी केला आहे.
एकाच तालुक्यातील २० गावे मतदार यादीतून वगळण्यामागे नेमके काय कारण आहे? ही केवळ तांत्रिक चूक आहे की, मतदारांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आहे, याची उत्तरे आता निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत. एकाच तालुक्यात ही परिस्थिती असेल, तर संपूर्ण जिल्ह्यात नेमके काय चित्र असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

