
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली जिल्ह्यातील शोषित, वंचित समाजाच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने कायदेशीर लढा देणारे समाजाभिमुख योद्धा जग प्रसिद्ध नामवंत वकील बोधीजी रामटेके यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार करीत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
पुण्यात कायद्याचे शिक्षण घेऊन नंतर फेलोशिप च्या माध्यमातून स्वीडन, स्पेन व लंडन येथुन कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत स्व:गावी गावी परतलेल्या ॲड. बोधीजी रामटेके यांना गडचिरोली जिल्ह्यातील जनसामान्यांच्या विविध समस्या बाबत जाणीव त्यांच्या वडिलाकडुन बालपणापासून त्यांना प्रेरणा,संस्कारीय वारसा लाभला होता.ॲड.बोधी यांना देश विदेशातून प्रत्यक्ष रित्या घेतलेला कायद्याचे ज्ञान व अनुभव याच्या जोरावर सचोटीने प्रत्यक्ष संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढून आदिवासी समाजातील प्रत्यक्ष वास्तविकता जाणून घेतली. या समाजातील लोकांना विकास प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.आदिवासी समाजाचे मूलभूत हक्क, रस्ता, पुल, आरोग्य व शिक्षणासंबंधी गंभीर प्रश्न न्यायालयीन पातळीवर मांडून अनेक प्रकरणांना न्याय मिळवून दिला आहे. वेंगणूर, सुरगाव, गरंजी, पुल्लीगुडम या दुर्गम गावातील नागरिकांना नावेतून मतदानासाठी प्रवास करावा लागत होता. या परिस्थितीविरुद्ध त्यांनी पाथ फाउंडेशनच्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून आकडेवारी गोळा केली व उच्च न्यायालयात पत्राद्वारे मुद्दा मांडला. न्यायालयाने त्याला याचिकेचे स्वरूप देत सरकारला नोटीस बजावली व सहा महिन्यांत रस्ते व पूल बांधण्याचे आदेश दिले. या संघर्षातून दुर्गम गावात विकासाची दारे खुली झाली.

गडचिरोलीतील अवैध जंगलतोड, रस्ते-पूलांची दुरवस्था, मानवी हक्कांचे उल्लंघन यांसारख्या अनेक प्रश्नांवर कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार रामटेके यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या कार्यावर वारंवार वृत्तांकन करून समाजात जागृती घडवून आणल्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे विशेष आभार ग्रामस्थांनी मानले.
त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व गडचिरोली जिल्हा चमुने हॉटेल वैभव येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. यावेळी ॲड. रामटेके यांची आई, वडील प्राचार्य श्याम रामटेके यांची उपस्थिती विशेष ठरली.
या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते जगदीश मडावी, प्रमोद आसूडकर आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

