
मनमिळावू स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वाला गडचिरोलीकरांचा भावपूर्ण निरोप

गडचिरोली : येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोचे यांचे आज दि.४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.
संजय कोचे हे मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या स्वभावातील साधेपणा, मदतीची तत्परता आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची वृत्ती यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता गडचिरोली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने मित्रांनी एक सच्चा, जिवलग आणि मनमिळावू मित्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
संजय कोचे यांच्या निधनाने गडचिरोलीच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.

