
रेगडी-हळदवाही जि.प. क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ६८ वर्षांचा संघर्ष; मंजेगावात सोमवारी शेतकरी संवाद

नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी), दि. ४ : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी तब्बल १९५८ पासून शेतीच्या पट्ट्यांपासून वंचित असून, गेल्या ६८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर प्रश्नाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा पट्टा मिळण्याच्या मागणीवर थेट प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे MLA Milind Narote सोमवारी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता मंजेगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेत त्यांना शेतीचे पट्टे मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही, कागदपत्रांची पूर्तता आणि पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी खासदार डॉ. अशोक नेते, तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे तसेच महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
६८ वर्षांच्या प्रतीक्षेला मिळणार का न्याय?
रेगडी-हळदवाही परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीचा पट्टा हा केवळ कागदावरील हक्क नसून त्यांच्या उपजीविकेचा आणि भविष्यातील सुरक्षिततेचा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे शेती कसूनही जमिनीचा अधिकृत पट्टा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर केवळ चर्चा न होता ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आठ गावांतील शेतकरी एकवटणार
या शेतकरी संवादात मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाही टोला, पेटतळा आणि भाडभीडी या आठ गावांतील शेती पट्ट्यांपासून वंचित शेतकरी सहभागी होणार आहेत.
१९५८ पासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी, आवश्यक कागदपत्रे, महसूल व भूमी अभिलेख विभागाकडून होणारी कार्यवाही तसेच पट्टे मिळविण्यासाठीची प्रक्रिया याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
प्रशासनासमोर शेतकऱ्यांचा थेट आवाज
वर्षानुवर्षे कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने आता शेतकरी आपला प्रश्न थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडणार आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यावर ठोस कालबद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
दरम्यान, या परिसरातील शेती पट्ट्यांपासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मंजेगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला प्रश्न मांडावा, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले आहे.
६८ वर्षांपासून रखडलेला शेती पट्ट्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार का, याकडे रेगडी-हळदवाही परिसरातील शेतकऱ्यांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

