kotgul police

‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाला प्रतिसाद; वृक्षारोपणासह जिओ टॅगिंगही पूर्ण

कोरची : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि जंगलाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन कोटगुलच्या वतीने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत कोटगुल पोलीस ठाण्यातर्फे ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन कोटगुल परिसरात आयोजित या उपक्रमात परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना पोलीस ठाण्यात आमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागेश टेकाम यांच्या उपस्थितीत नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करावे आणि जंगलाचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले.

या मोहिमेंतर्गत सायंकाळी ५ ते ६.१५ वाजेपर्यंत पोलीस स्टेशन कोटगुल परिसरात एकूण ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये करंज २००, चिंच २००, आपटा ३०० आणि अंजन ५० अशा विविध प्रजातींच्या वृक्षांचा समावेश होता. विशेष म्हणजे, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे जिओ टॅगिंगही करण्यात आले.
या उपक्रमाला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. पोलीस विभागाने केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरती मर्यादा न ठेवता पर्यावरण संवर्धनासाठीही पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

