
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी, गडचिरोली.
—प्रशासनाचे दुर्लक्ष
–जिल्ह्यातील खासदार व आमदार यांचा याकडे काणाडोळा.

आलापल्ली: आलापल्ली-सिरोंचा हा जिल्ह्यातील महत्त्वाचा महामार्ग सध्या खड्रेमय झाला असून, प्रवाशांना अक्षरशा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, वाहतूक कासवगतीने सुरू आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
पावसाळ्यात महामार्गावरील मुरूम उखडून गेला आहे. ठिकठिकाणी खोल खड़े, चिखल व पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आलापल्ली-सिरोंचा हा रस्ता तेलंगणा व छत्तीसगढ़ राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे दररोज शेकडो वाहने या मार्गावरून धावतात. याशिवाय जड
वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात रेलचेल असते.
मात्र रस्त्याच्या अवस्थेमुळे प्रवासासाठी लागणारा वेळ दुपटीने वाढला आहे. नागरिकांनी वारंवार महामार्गकडे दुरुस्तीची मागणी केली. तरीही अद्याप काम सुरू झालेले नाही.
दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र, या महामार्गाच्या कामात कधी वन विभागाची आडकाठी येते, तर कधी कंत्राटदार काम करत नाही. मात्र, याची शिक्षा या भागातील नागरिकांना सोसावी लागत आहे. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.
आलापल्ली- सिरोंचा महामार्गावरील खड्ड्यांत असे पाणी साचले आहे.
महत्त्वाचा राष्ट्रीय मार्ग असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील सात वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू आहे, पण काम संथ गतीने सुरू असल्याने रुग्णांसह विद्यार्थ्यांचे हाल होतात. गर्भवतींना दवाखान्यात नेताना मोठी कसरत करावी लागते. या मार्गाचे काम विनाविलंब पूर्ण करून दुरुस्ती करण्यात यावी अशी जोराने नागरिकांची मागणी होत आहे.
या रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून बस मधून खासदार व आमदार यांनी एकदा प्रवास करून बघावं अशेही गावकऱ्यांचे मत आहे.

