
MRM पोर्टलपासून CEIRपर्यंत नागरिकांना मार्गदर्शन; ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया समजावली

नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी,| दि. ०४ ऑक्टोबर :

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि सायबर फसवणुकीला वेळीच आळा घालता यावा, यासाठी चामोर्शी पोलिसांकडून सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन चामोर्शी येथे अधिकारी, अंमलदार व होमगार्ड जवानांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या MRM पोर्टलबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तातडीने कोणती कार्यवाही करावी, फसवणुकीची रक्कम गोठविण्याची प्रक्रिया काय आहे, तसेच उपलब्ध यंत्रणांच्या माध्यमातून ती रक्कम परत मिळविण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतात, याबाबत त्यांनी माहिती दिली.
सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी वेळीच तक्रार नोंदविणे आणि तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मार्कंड मोहल्ल्यातही सायबर सुरक्षेचा जागर
सायबर जनजागृती मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून चामोर्शी पोलीस स्टेशनच्या पथकाने सायंकाळी मौजा मार्कंड मोहल्ला येथील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देऊन उपस्थित नागरिक व भाविकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली.
यावेळी भावेश वरघंटीवार, शशी चिडे, मेजर पौर्णिमा चांहदे, सरक्का दुर्गम्म ठोंबरे यांनी नागरिकांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
विशेषतः Mule Account (म्युल खाते) म्हणजे काय, अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या APK फाईल डाउनलोड केल्यास कोणते धोके निर्माण होऊ शकतात, GRM/MRM पोर्टलचा वापर कसा करावा, याबाबत नागरिकांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.
तसेच मोबाईल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल ब्लॉक करून त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया नागरिकांना समजावून सांगण्यात आली.
फसवणूक झाली तर घाबरू नका, तातडीने तक्रार करा!
सायबर फसवणुकीनंतर घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे, व्यवहाराची माहिती व पुरावे जतन करणे आणि वेळ न दवडता तक्रार करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नागरिकांना सांगितले.
‘सावधानता हीच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षिततेची पहिली पायरी’ या उद्देशाने चामोर्शी पोलिसांकडून गावोगावी व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी अनोळखी लिंक, APK फाईल, फोन कॉल, OTP किंवा संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चामोर्शी पोलिसांची ही जनजागृती मोहीम नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

