
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरणावर भर; गावागावात संपर्क वाढविण्याचे आवाहन

नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. १ ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. अहेरी येथील राजवाड्यात महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह महिला कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी रविंद्रराव बाबा आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र भाऊ वासेकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन राव बाबा आत्राम, प्रदेश महिला सरचिटणीस पुष्पा ताई अलोने, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका ताई गडपल्लीवार, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, जिल्हा उपाध्यक्ष फहीम काझी, जिल्हा सचिव सुरेंद्र अलोने, ओलालवार, रतन दुर्गे, युवती तालुकाध्यक्ष प्रणाली दुर्गे, माजी ग्रामपंचायत सदस्य सविता सीदाम तसेच ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बेझलवार आदी उपस्थित होते.
गावागावात संपर्क वाढविण्याचे रविंद्रराव आत्राम यांचे आवाहन
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना रविंद्रराव बाबा आत्राम यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावागावात संपर्क वाढवून कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यावर भर
जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनीही कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी आतापासूनच सक्रिय होण्याचे आवाहन केले. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महिला आघाडीच्या आढावा बैठका घेण्यात येत असून, यामुळे संघटनात्मक कामाला अधिक गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका मांडताना त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आवाहन केले.
महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन
महिलांना समान हक्क व न्याय मिळण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सक्रियपणे काम करावे, तसेच महिलांच्या विविध प्रश्नांसाठी शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीचे संचालन जिल्हा सचिव सुरेंद्र अलोने यांनी केले, तर प्रास्ताविक सारिका गडपल्लीवार यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे अहेरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून आले.

