
मृतदेहावरील जखमांवरून आरोपी डावखुरा असल्याचा अंदाज; तांत्रिक पुरावे अन् गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लावला छडा
चामोर्शी : तालुक्यातील नारायणपूर येथे ५ सप्टेंबर रोजी शेतात संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या ६० वर्षीय गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड यांच्या खुनाचा अखेर गडचिरोली पोलिसांनी छडा लावला आहे. पूर्ववैमनस्य व जुन्या वादातून काठीने मारहाण करून त्यानंतर दगडाने ठेचून गोपीकाबाई यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, संदीप रावजी टेकाम (वय ३५, रा. नारायणपूर चक नं. २) याला पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी अटक केली.
या अत्यंत क्लिष्ट आणि गंभीर खुनाच्या तपासात मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण हा महत्त्वाचा धागा ठरला. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त केली. या दिशेने तपास पुढे नेत पोलिसांनी मयत महिलेचे कौटुंबिक संबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहिती यांची सांगड घालत संशयित संदीप टेकाम याला ताब्यात घेतले.

काठीने मारहाण; दगडाने ठेचून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातून गोपीकाबाई यांच्यावर काठीने मारहाण केल्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संदीप टेकाम याला अटक केली.
शेतात गेल्या अन् परतल्याच नाहीत
५ सप्टेंबर रोजी गोपीकाबाई गायकवाड या शेतात गेल्या होत्या. मात्र, संध्याकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी शेत परिसरात त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६०/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पथकांनी लावली सर्व शक्ती पणाला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पोमकें घोट आणि स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
सुरुवातीला ठोस पुरावे उपलब्ध नसतानाही पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, मृतदेहावरील जखमा, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. अखेर संशयित संदीप टेकामपर्यंत तपास पोहोचला आणि चौकशीतून खुनाचा उलगडा झाला.
आरोपीला चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वपूर्ण कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक पोलीस निरीक्षक आगलावे, पोमकें घोटचे सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश खारोडे, पोलीस ठाणे रेगडीचे सहायक पोलीस निरीक्षक गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वा कराळे तसेच अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
क्लिष्ट खुनाचा गुन्हा तांत्रिक पुरावे, बारकाईने केलेले निरीक्षण आणि गोपनीय माहितीच्या आधारे उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकाचे कौतुक केले.

