
विद्यार्थ्यांना आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाच्या खबरदारीसह प्रथमोपचाराचे मार्गदर्शन
चामोर्शी : येथील यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने उपाययोजना करता यावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रशिक्षक नितीन कावडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रेमानंद वालदे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना नितीन कावडकर यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे विविध प्रकार, आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्तीच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यास कोणती प्राथमिक मदत करावी, महापुराच्या परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विषारी व बिनविषारी साप ओळखण्याची पद्धत, सर्पदंश झाल्यास घ्यावयाची प्रथमोपचाराची काळजी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. आपत्तीच्या काळात घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शाम रामटेके म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाबाबत मिळालेली माहिती विद्यार्थ्यांनी केवळ शिबिरापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणावी. स्वतःसोबतच इतरांचेही प्राण वाचविण्यासाठी ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रविण गव्हारे यांनी केले, तर आभार प्रदीप भांडेकर यांनी मानले. शिबिराला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

