
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
अहेरी : अहेरी शहरातील विविध प्रभाग, मुख्य रस्ते, चौक तसेच अंतर्गत रस्त्यांवरील अनेक पथदिवे तसेच हायमास्ट लाईट मागील काही दिवसांपासून बंद असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मिथुन नार्मलवार यांची आज भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी शहरातील बंद असलेले सर्व पथदिवे तसेच हायमास्ट लाईट तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत, तसेच शहरातील सर्व प्रभागांची पाहणी करून बंद पथदिव्यांची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
पावसाळा चालू असून पथदिवे बंद असल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रात्रीच्या वेळी कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे अपघात तसेच चोरी व इतर अनुचित प्रकारांची शक्यताही वाढू शकते.
भविष्यात पथदिवे दीर्घकाळ बंद राहू नयेत यासाठी नियमित देखभाल, तपासणी आणि तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केली.
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असून, अहेरी शहरातील अंधाराचे साम्राज्य तातडीने दूर करून शहर प्रकाशमय झाले पाहिजे,” अशी भूमिका नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी व्यक्त केली.

