
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/देसाईगंज,दि.२७ जूलै : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या देसाईगंज (वडसा) तालुका दौऱ्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आयोजित या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन विस्तार, जनसंपर्क आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदू नरोटे हे होते. दौऱ्यादरम्यान तनुश्रीताई आत्राम यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत गावपातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी प्रभावी नियोजन राबविण्याचे आवाहन केले. युवक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात पक्षाच्या विचारधारेशी जोडून तळागाळात पक्षाचा विस्तार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

“जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये राहून सक्रियपणे काम करावे. पक्षाची भूमिका प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करणे हीच खरी संघटन बांधणी आहे,” असे प्रतिपादन तनुश्रीताई आत्राम यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला प्रदेश सचिव युनूस शेख, विधानसभा प्रभारी ऋषिकांत पापडकर, तालुका अध्यक्ष रिंकू बावणे, शहराध्यक्ष हरीश मोटवानी, संघटन सचिव लतीफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष फहीमभाई कासी, माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवानी, जिल्हा सचिव कपिल बावणे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष रिजाजूल शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
तनुश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या संघटनशक्तीचा प्रत्यय देणारा ठरला.

