
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार

चामोर्शी: चामोर्शी तालुक्यात नव्याने उभारण्यात आलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बसस्थानक सर्व सुविधा आणि आवश्यक बांधकामासह पूर्ण होऊनही तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे अद्यापही बसस्थानक सुरू करण्यात आले नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला सात दिवसांत बसस्थानक सुरू करण्याचा अल्टिमेटम देत अन्यथा जनतेच्या हस्ते लोकार्पण करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसांतही प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून एसटी बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभारलेले बसस्थानक वापरात न आणणे ही प्रशासनाची निष्क्रियता असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी हा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी चामोर्शी येथे भेट देत नागरिकांसह नवीन बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत बसस्थानक पूर्णपणे तयार असून केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे ते बंद असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पवन गेडाम यांनी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका करत, “जनतेच्या मूलभूत सुविधांवर राजकारण करणे थांबवा. स्थानिक आमदारांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसेल, तर येत्या सात दिवसांत शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांच्या उपस्थितीत नवीन बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येईल. त्यानंतर एकही एसटी बस जुन्या ठिकाणी उभी राहू दिली जाणार नाही. गरज पडल्यास चक्काजाम आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला.
प्रशासनाने उद्घाटनाचे राजकारण न करता नवीन बसस्थानक तातडीने जनतेच्या सेवेत उपलब्ध करून द्यावे. अन्यथा शिवसेना तीव्र जनआंदोलन उभारेल आणि त्यास प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

