
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
गडचिरोली : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील भात, तूर, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही सर्वे व समिती न नेमता राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एक हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व जंगोरायताड महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व जंगोरायताड महिला संघटनेच्या पदाधिकारीनी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिके आडवी झाली असून उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असून, पीकविमा योजनांचे लाभ देखील वेळेत मिळत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे.
या निवेदनावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, जिल्हा सचिव ( महिला ) विद्या दुग्गा, जिल्हा उपाध्यक्ष देवराव अलाम, तालुका अध्यक्ष ( महिला ) लिना कोकोडे, शहर अध्यक्ष ( महिला ) आरती कोल्हे, गोगोपा चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, तनुजा कुमरे, रेखा तोडासे, निकिता कुमरे आदी उपस्थित होते.

