
सरसकट नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
सावली: – तालुक्यात सद्या स्थितीत भात पिकाचा हंगाम सुरु आहे. जवळपास भातपिक कापणीला आलेले असून शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या. तालुक्यात एकूणात खरीप हंगामात भात पिक लागवड अंदाजे १९२५० हेक्टरात झाल्याची माहिती अधिकृत कार्यालयातून प्राप्त आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसणवारी करून, घरातील वस्तू गहाण ठेवून शेतात पिकाची पेरणी केली. ज्याच्या भरवसावर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वार्षिक बजेट तयार असतो. पण तेही नियतीला व निसर्गाला मान्य नसल्यागत दृश्य सद्याची स्थिती बघता अनुभवायला मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्याला स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते. दुसरीकडे निसर्गाचा असहनीय
प्रकोपही सहन करतोय. पण या कृषी प्रधान म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रत शेतकरीच दुःखाच्या प्रवाहात वाहत आहे. नेहमीच दुःख वाट्याला येत असल्याने शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून नवतरुण शेताकडे दुर्लक्ष करून वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. ज्याचा फटका येणाऱ्या काळात येथील

प्रत्येक घटकांना बसणार असल्याची संभावना निर्माण झाली आहे. भांडवलदार मालामाल फक्त शेतकरी कंगाल राहावं अशी इच्छा संबधित प्रशासनाची आहे कि काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. शेतकरी मे महिन्यापासून पासून तर आजपर्यंत शेतातील पिकांसाठी नांगरणी, पेरणी, रोवणी यासारख्या पायऱ्या ओलांडत अंतिम
टप्प्यातील कापणी व मळणी तालुक्यात काही ठिकाणी शेतपिकांची चालू आहे. त्यामुळे शेतकरी शेतात पिकवलेलं सोनं घरी येईल म्हणून उत्साहित झाला. मात्र सिंदेवाही तालुक्यात नैसर्गिक कोपामुळे अधिकच पाऊस हजेरी लावत आहे. ज्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर उत्साही मनाला हिरमुसून शेतातही पाणी आणी डोळ्यात सुद्धा पाणी आले. तालुक्यातील पिक पावसाने झोडपून काढल्याने अतोनात नुकसान शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. कापणी केलेल्या धान्याचे कळपांचे दाणे पाण्यामुळे गळून मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतातील सोन्याच्या खाणीत पाणीच पाणी झाले. संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.


