
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी:-
तालुक्यातील भेंडाळा परिसर शेवटच्या टोकावर असल्याने येथील धानपिकाला रेगडी नहराचे पाणी फार कमी प्रमाणात मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहॆ. धानपीक आता गर्भात आहे. पाण्याअभावी पीक करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करून शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. फराडा, रामाळा, मोहुर्ली,वेलतूर तुकूम, सगणापूर, वाघोली,एकोडी , रामसागर, कळमगाव या गावातील धानपिकाला कन्नमवार जलाशयाचे पाणी पुरविले जाते. मात्र सिंचन विभागाच्या नियोजन अभावाने या गावांना दरवर्षी प्रमाणे यंदा ही पाणी मिळण्यास अडचण होतं आहे. परिणामी धानपीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. धान आता गर्भात आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यात सिंचन विभागाचे अधिकाऱ्यावर महत्त्वाची जबाबदारी असते.रेगडी तलावाचे पाणी सुमारे ३० ते ४० किमी अंतरावर जाते. तेवढ्या दूर पाणी पोहोचविण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी वाटपावर नियंत्रण नसल्याने शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचण जात आहे. त्यामुळे आता शेतीला पाणी मिळणे आवश्यक आहे. अशा स्थितीत पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाला. रेगडी तलाव पूर्णपणे भरला आहे. तरीही धानपीक करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे परिसरातील बरेचसे शेतकरी यांनी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या नेतृत्वात सिंचन कार्यालय येथे जाउन अधिकाऱ्याना जाब विचारण्यात आला. जर का शेवटच्या शेतीला पाणी मिळालं नाही तर कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रमोद भगत व शेतकऱ्यांनी दिला. याप्रसंगी भेंडाळा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीना धरणाची दुरुस्ती करावी जिल्ह्यातील एकमेव मोठे सिंचन प्रकल्प असलेले दिना धरण या धरणाचे बांधकाम 1969 ते 1974 या पाच वर्षात पुर्ण झालेले असून याची सिंचन क्षमता 12 हजार हेक्टर एवढी आहे. या धरणाच्या कालव्याचे जाळे रेगडी ते चामोर्शी तालुक्यातील भेंडाळापर्यंत पसरलेले आहे.
या प्रकल्पाचे कालवे अंदाजे 48 वर्षापुर्वी बांधलेले असल्याने ते जिर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत शेतकर्यांना सिचंनासाठी पाण्याचा पुरवठा होत नाही. बर्याच ठिकाणी जागोजागी या कालव्याला छिद्र पडल्यामुळे पाणी विनाकारण वाहून जातो. स्थानिक स्तरावरील यंत्रणेमार्फत धातुर मातुर तात्पुर्ती दुरुस्ती केल्या जाते. मात्र ही दुरुस्ती पहिल्याच पाण्यात वाहून जात असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्या करीता दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेगडी ते टेलरिजलपर्यंत या कालव्याचे सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम करणे आवश्यक आहे. स्थानिक आमदार, खासदार यांचे या बाबीकडे दुर्लक्ष असून आता तरी ते या कामाचे नियोजन करुन पाठपुरावा करावा शासनानेही याकडे स्वयं प्रेरणेने लक्ष देऊन या कालव्याच्या सिमेंट कॉक्रीट अस्तरीकरणासाठी नियोजन करून जिल्ह्यात सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्याव्या.
–दरवर्षी भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचन कार्यालयावर जात असतो मोर्चा.
रेगडी येथील दिना धरणामुळे चामोर्शी तालुक्यातील कित्येक गावांत शेतीला पाणी मिळत असते , यंदा रेगडी धरन पूर्ण पणे भरलेले असून सुध्दा कर्मचाऱ्यांच्या निकृष्ठ नियोजनामूळे भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हढं पाणी मिळत नाही त्यामुळे दरवर्षी धान पिक गर्भात असतांना शेतकरी सिंचन कार्यालयावर मोर्चा काढत असतात.

