
– खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल
चामोर्शी : गडचिरोली जिल्हातील प्रमुख शहर असलेल्या चामोर्शी तालुका हा सर्व बाजूने खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच चामोर्शी- आष्टी, चामोर्शी–मूल, चामोर्शी – घोट मार्गावरील गंभीर खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरजागड येथून दररोज शेकडो अवजड वाहने कच्चामाल घेऊन या मार्गावरून जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हा मार्ग गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा मुख्यमंत्री मार्ग असल्याने त्याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व संघटनांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन देऊन या मार्गाच्या दुरुस्तीकरिता तात्काळ निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

सदर निवेदनावर डॉ. होळी यांनी त्वरित दखल घेत संबंधित विभाग तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर निधी मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी निवेदन देताना राहुल निमगडे, राहुल गिरडकर, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी, लोमेश सातपुते आदी नागरिक उपस्थित होते.

