
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली : तालुक्यातील दोलंदा येथील ५७ वर्षीय हरी बोहरण वड्डे यांचा कथित वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वन्यजीव हल्ला नुकसानभरपाई योजनेंतर्गत आर्थिक मदतीचा पहिला धनादेश देण्यात आला. शासनाकडून मंजूर होणाऱ्या एकूण २५ लाख रुपयांच्या मदतीपैकी १० लाख रुपयांचा धनादेश मृताच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी हरी वड्डे हे दोलंदा गावाजवळील जंगल परिसरात गेले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती. बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीच्या आधारे वन विभागाने आवश्यक पंचनामा व इतर कार्यवाही सुरू केली होती.

या घटनेमुळे दोलंदा, जारावंडी तसेच परिसरातील जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही परिसरात वाघाचा वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटना समोर आल्याने नागरिकांनी वन विभागाकडे वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. आता मनुष्याचा जीव गेल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
दरम्यान, हरी वड्डे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी यासाठी वन विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार मंजूर होणाऱ्या २५ लाख रुपयांच्या मदतीतील पहिला १० लाख रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. उर्वरित मदत शासनाच्या नियमानुसार संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी ACF मा.रामटेके, RFO मा.नगराळे, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, डॉ. मितालीताई आत्राम, कोडापे सर,दोलंदा येथील पोलीस पाटील तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वड्डे कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना शासनाच्या मदतीमुळे काही प्रमाणात आधार मिळेल, अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच वन विभागाने गस्त वाढवून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हरी वड्डे यांच्या मृत्यूने दोलंदा परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अद्याप कायम असून, शासनाच्या आर्थिक मदतीसोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वन विभाग कोणती ठोस पावले उचलतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

