
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२७ जूलै: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली तालुक्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची तालुक्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, पक्षाच्या विचारधारा व ध्येयधोरणांचा तळागाळातील जनतेपर्यंत प्रचार-प्रसार करणे, युवती व महिलांना संघटनेशी जोडणे तसेच आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी नंदू नरोटे, रिंकू पापडकर, लीलाधर भरडकर, पिंकू बावणे, अमोल कुळमेथे, विवेक बाबणवाडे, किशोर बावणे, माधुरी मंगरे, प्रतिभा कुमरे, अंजुम सय्यद, फईम काजी, संजय शिंगाडे, कुणाल चिलगेलवार, सुवर्णा पवार आणि अविनाश कायकर यांच्यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान तनुश्रीताई आत्राम यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात युवती काँग्रेसच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडत त्यांच्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
युवती काँग्रेसच्या माध्यमातून नव्या युवा नेतृत्वाला संधी देत संघटनेची व्याप्ती वाढविण्यासोबतच गावागावात पक्षाची संघटनात्मक ताकद निर्माण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि सक्रियतेने काम करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी केला.
या बैठकीमुळे गडचिरोली तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नव्या उमेदीने सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

