
प्रतिनिधी| प्रलय सहारे
भेंडाळा,दि.२९ जूलै : गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना आज झालेल्या रिमझिम पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
विशेषतः धान, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाअभावी पिकांच्या वाढीबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी झाली असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

रिमझिम पावसामुळे शेतातील ओलावा वाढण्यास मदत झाली असून आगामी काही दिवसांतही चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले असून नागरिकांनाही उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी आता नियमित आणि समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त करत शासनानेही शेतीसाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

