माझ्या भगिनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. निराधार, विधवा, परित्यक्ता भगिनींसाठी अनुदान योजनेचे अनुदान सहाशे रुपया वरून मी अर्थमंत्री असताना बाराशे रुपये केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १५००रु वरून २१०० रु देण्याचे आपण जाहीर केले आहे. जात पात धर्म न बघता मी नेहमीच बहिणींच्या कल्याणाची भूमिका घेतली आहे व सदैव माझी हीच भूमिका राहील अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी दिली.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महिला पदाधिकारी,बूथप्रमुख, पेजप्रमुख यांच्याशी संवाद सेतूच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा माता महाकाली, राणी हिराई यांचा जिल्हा आहे. आमच्या भगिनी आदिशक्तीची रूपे आहेत. माझी लाडकी बहीण – सुरक्षित बहीण हे ऍप मी तयार केले आहे. महिलांच्या शैक्षणिक प्रगती साठी एस एन डी टी विद्यापिठाचे केंद्र बल्लारपूर येथे आपण आणले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ बहिणींना मिळावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा मी येत्या काळात आखणार आहेअसेही ते म्हणाले. news jagar
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. काँग्रेसचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपले प्रयत्न व काँग्रेसचे अपयश मतदारांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संवाद सेतू चे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले.