पत्रकार परिषदेतून भाजपा व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी
पुनर्विचार न झाल्यास संयुक्तपणे राजीनामे देणार
दिनांक २७ ऑक्टोंबर गडचिरोली
आमदार डॉ. देवराव होळी यांचा गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास व त्यांचा जनतेशी असलेला प्रचंड जनसंपर्क हा त्यांना विजय मिळवून देणारा आहे. मात्र आपल्यापेक्षा कोणीच मोठा नेता निर्माण होऊ नये या भीतीने भाजपातील काही जनाधार नसलेल्या नेत्यांनी खोट्या व निराधार गोष्टींचा आधार घेउन आमदार होळी यांची उमेदवारी कापण्यामध्ये यश मिळवलेले आहे. परंतु त्यांचें यश हे महिनाभरा पुरते आहे .त्यानंतर लोकसभेसारखी परिस्थिती गडचिरोलीमध्ये निर्माण होईल ही वास्तविकता आहे. केवळ वैयक्तिक द्वेषातून आमदार होळी यांचा पत्ता कापण्यासाठी भाजपाच्या काही निवडक स्थानिक नेत्यांनी संपूर्ण पक्षाला वेठीस धरले आहे. ही बाब भाजप नेतृत्वाने लक्षात घ्यावी व निवडणुकीत हारणारा उमेदवार न देता जिंकून घेणाऱ्या आमदार होळी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पुनर्विचार करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
मागील ६ महिन्यांपासून आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध समाजाचे सामाजिक मेळावे , हजारोंच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचे मेळावे घेऊन जनतेमध्ये आपली विजयाची प्रतिमा उभी केली आहे. प्रत्येक समाजाला, पक्षातील सर्वांना सोबत घेऊन त्यांनी मागील १० वर्षात काम केले आहे. असे असतानाही केवळ स्थानिक नेत्यांचा वैयक्तिक द्वेषाचा आधार घेऊन गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उमेदवार बदललेला आहे . पक्षाने दिलेल्या उमेदवारांचा जनतेसोबत संपर्क नाही. केवळ आमदार होळी यांना उमेदवारी मिळू नये म्हणुन नाव पुढे करण्यात आले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव आजच दिसून येत आहे. दिनांक २५ सप्टेंबरला नामांकन दाखल करतेवेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १२ ते १५ हजार लोकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष, महामंत्री, माजी खासदार व वरिष्ठ नेते नसतानाही मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित दर्शवून आमदार होळी यांना पाठिंबा दर्शवला होता. यावरून त्यांची विधानसभा क्षेत्रांत असणारी लोकप्रियता दिसून येते.
त्यामुळे पक्षाने पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने गडचिरोलीमध्ये मिलिंद नरोटे यांना दिलेली उमेदवारी रद्द करून आमदार होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. मात्र वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत पुनर्विचार न केल्यास भाजपातील कार्यकर्ते संयुक्तपणे आपले राजीनामे देणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.