पतीदेवाची क्षमा मागते, लेकरांना चांगलं सांभाळा… पत्र लिहून संपवलं जीवन

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

गडचिरोली: ‘पतीदेवाला मी क्षमा मागते, मी तुम्हाला सोडून जात आहे, लेकरांना चांगलं सांभाळाल ही अपेक्षा आहे..’ अशी सुसाईट नोट लिहून विवाहितेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस कोरची शहरात उघडकीस आली. आईने जीवनयात्रा संपविल्याने दोन  चिमुकली भावंडे मातृप्रेमाला पारखी झाली आहेत.

अर्चना रंजित सहारे (वय ३६, रा. वॉर्ड क्र.५ कोरची) असे मृत विवाहितेचे नाव आहे. अर्चना यांचे पती रंजित यांचे गावातच ग्राहक सेवा केंद्र आहे. या दाम्पत्यास पाच वर्षांची मुलगी न्यान्सी व आरमान नावाचा दोन वर्षांचा मुलगा  अशी दोन आपत्ये आहेत. शहरातील परिचित व्यक्तीच्या कार्यक्रमातून जेवण करून रंजित व अर्चना सहारे हे दाम्पत्य वॉर्ड क्र. ५ मधील किरायाच्या खोलीवर गेले.    मध्यरात्री पत्नी अर्चनाने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या खोलीत सुसाईट नोट आढळली. त्यात अर्चनाने ‘मी जे काही करत आहे, त्याला फक्त मी जबाबदार आहे ,याच्यात कुणाचाही हात नाही, मी या जीवनाला कंटाळली आहे. मी गेल्यावर माझा परिवार सुखात राहील ही अपेक्षा आहे’ असा मजकूर लिहिला आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर पती रंजितला पत्नी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. कोरची पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दुपारी ३ वाजता  अंत्यसंस्कार करण्यात आले.

कारण अस्पष्ट

दरम्यान, सुसाईट नोटमध्ये अर्चना सहारेने मी जीवनाला कंटाळली आहे… असे कारण नमूद केले आहे, पण आत्महत्येचे पाऊल उचलण्यासारखे कोणते कारण होते, हे अस्पष्ट आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली असून नातेवाईकांच्या जबाबानंतर अधिक माहिती पुढे येईल. तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत