नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. श्रीकांत लेकुरवाडे (२६) असे आरोपीचे नाव आहे.
२०१८ मध्ये पीडित २५ वर्षीय तरुणीची श्रीकांतशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. श्रीकांतने तरुणीला फिरायला जाण्याचा बहाणा करून एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि तिच्यावर हॉटेलमध्ये बलात्कार केला. तो वारंवार तरुणीचे लैंगिक शोषण करीत होता. शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर तो थेट लग्न न करण्याची धमकी देत होता. त्यामुळे वारंवार ती श्रीकांतसोबत हॉटेलमध्ये जायला लागली. परंतु, लग्नाबाबत विचारताच टाळाटाळ करायचा.
काही दिवसांपूर्वी तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी विचारणा केली. आईवडिलांशी बोलून लग्नाबाबत चर्चा करण्याची गळ घातली. परंतु, श्रीकांतने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. नातेवाईक असलेल्या तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगून तरूणीची बोळवण करीत होता. त्यामुळे तरुणीने घटनेची तक्रार पोलिसात केली. गुन्हा नोंद झाल्यापासून श्रीकांत फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.