
सदर फोटो AI ने बनविला आहे. याचा वास्तव फोटोशी काहीही संबंध नाही.
अमित कत्तीवार | जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली (गडचिरोली): एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मात्र शिक्षण व्यवस्थेच्या धिंडवडे उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक मारलेल्या दौऱ्यात तब्बल ९ प्राथमिक शिक्षक कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय शाळेतून दांडी मारून गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा शिक्षण विभागात तीव्र खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
एटापल्ली तालुक्यात गट्टा, कसनसूर, तोडसा, जरावंडी, दोलंदा, कोटमी, सुरजागड आणि एटापल्ली अशी एकूण आठ शैक्षणिक केंद्र आहेत. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या दोनशेहून अधिक शाळा चालवल्या जातात. दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा गैरफायदा घेत काही शिक्षक कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या.
या पार्श्वभूमीवर, एटापल्लीचे गटशिक्षणाधिकारी मा.ऋषिकेश बुरडकर यांनी १८ आणि १९ ऑगस्ट रोजी विविध शाळांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणी दरम्यान कसनसूर आणि कोटमी केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध शाळांमधील तब्बल ९ शिक्षक शालेय वेळेत अनुपस्थित असल्याचे आढळून आले.
गैरहजर शिक्षकांची नावे आणि शाळा:
१. प्रकाश सावजी मडावी (कसनसूर)
२. साईनाथ एकनाथ तिमाडे (गडेरी)
३. प्रकाश रघुनाथ मोहूर्ले (आसांवडी)
४. वसंत झुगाजी गव्हारे (झुरी)
५. पितांबर पुंडलिक चापले (नैनगुडा)
६. कृष्णानाथ हरीसाय बडा (हालेवारा)
७. दीपक गोपाल मंडल (वेनासूर)
८. महादेव राजाराम दुर्गे (कोटमी)
९. रेखचंद कैकाळू वाळके (कोईंडूळ)
प्रशासकीय कारवाई व नोटीस
कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत रजा न घेता गैरहजर राहिल्याप्रकरणी एटापल्ली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने २० ऑगस्ट रोजी या सर्व ९ शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटीस’ (Show Cause Notice) बजावली आहे. संबंधितांना तीन दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मा.प्रेरक उजगारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद गडचिरोली यांनी स्पष्ट केले की, “दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. प्राप्त माहितीनुसार कसून चौकशी केली जाईल आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. दुर्गम शाळांमधील शैक्षणिक दर्जा व शिक्षकांची उपस्थिती तपासण्यासाठी मी स्वत: प्रत्यक्ष भेटी देणार आहे.”
उपस्थिती प्रणालीवर प्रश्नचिन्ह
शिक्षकांची डिजिटल उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक आणि ऑनलाइन प्रणाली लागू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष शाळांवरील चित्र वेगळेच असल्याचे या कारवाईवरून उघड झाले आहे. ‘ऑनलाइन हजेरी’ आणि ‘प्रत्यक्ष हजेरी’ यात मोठी तफावत तर नाही ना, तसेच मस्टरवर खोटी हजेरी लावून वेतन उचलले जात आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता पालक आणि स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

