जावेद अली
गडचिरोली
एटापल्ली :- तालुक्यातील जारावंडीपासून सुमारे ६ किमी अंतरावर असलेल्या शिरपूर गावाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव प्रकाश उसेंडी (वय ४२) असून ते शिरपूर (जारावंडी) गावचे रहिवाशी होते. प्रकाश हे परिसरात नावलौकिक प्राप्त समाजसेवक होते आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे अनेकांच्या गळ्यातले ताईत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातग्रस्त पिकअप वाहन हे पेंढरी येथील एका प्रचलित व्यापाऱ्याचे असल्याचे समजते. सदर घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वेगामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
प्रकाश उसेंडी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन लहान मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रकाश हे त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार होते,समोरचा तपास जारावंडी पोलीस करीत आहे