Chandrapur : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवासेना
शहर प्रमुख शिवा मिलिंद वझारकर (Shiva Milind Vajharkar) हत्येप्रकरणी उबाळा गटाचा परिवहन सेनेचा जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रेती तस्करीच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. स्वप्नील चंद्रकांत काशीकर (38), रिझवान अजहर पठाण (30), नाजीर रफिक शेख (21), हिमांशू देवानंद कुमरे (23), सुमीत संतोष दाते (26), रोहित कृष्ण पितरकर (23), चैतन्य उर्फ लाला सुनील ऑस्कर (18), अन्सार अलिमखान पठाण (24) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हिमांशू कुमरे, स्वप्नील काशीकर, शिवा वझरकर हे तिघेही मित्र होते. मागील काही दिवसांपूर्वी हिमांशू कुमरे व शिवा वझरकर यांच्यामध्ये कारणावरून वाद झाला. दरम्यान, हिमांशूने शिवाला भ्रमणध्वनीद्वारे स्वप्नील काशीकरचे कार्यालयात गाठले. यावेळी हिमांशू व शिवा यांच्यात जुन्या वादावरून वाद सुरू झाला. वाद टोकाला गेला. हिमांशूने शिवावर धारदार शस्त्राने वार केले. हिमांशूचे साथीदारही होते. त्यांनीही शिवाला मारहाण केली.
शिवाच्या मित्रांनी घटनास्थळ गाठून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवाला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी 302, 143, 147, 148, 149 भादंवि 135 अन्वये गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे करत आहेत.
Shiva Vajharkar Murder Case
वाहनाची तोडफोड : शिवाची हत्या झाल्याची माहिती त्याच्या मित्राला होताच त्यांनी स्वप्नील काशीकर याचे कार्यालय गाठले. तेथे ठेवलेली जेसीबी, हायवाची तोडफोड केली. मात्र रामनगर पोलिसांनी तेथे धाव घेतल्याने जमाव पांगला होता.
तीन दिवसांची पोलिस कोठडी : हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली, २६ जानेवारीला पुन्हा तिघांना अटक केली. तर शनिवारी आणखी दोघांना अशी एकूण आठ जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची म्हणजेच ३० जानेवारीपर्यंत अटक केली आहे.