गडचिरोली दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे काल पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव सुमंत पाष्टे रंगमंचावर उपस्थित होते.
या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत भारतमाता गणेश मंडळ, परभणी यांना प्रथम, जय भवानी मित्र मंडळ ठाणे यांना द्वितीय तर वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव मंडळ, लातूर यांना तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचप्रमाणे एकूण 36 जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
श्री. अमित साखरे, उपसंपादक, न्यूज जागर