७ हजारांसाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकावला, एटापल्ली तालुक्यातील थरार

Uncategorized
Unique Multiservice
Share

गडचिरोलीउसने घेतलेले सात हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला. ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

संपत लुला दुर्वा (३२, रा.पेठा ता. एटापल्ली) असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी (सर्व रा. पेठा) यांचा आरोपींत समावेश आहे. तिघेही ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करायचा. १७ मार्चला तो काही कामानिमित्त पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यामुळे घातपाताचा अंदाज होता. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरवली. पो.नि. नीळकंठ कुकडे, उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, शुभम म्हेत्रे, रोहिणी गिरवलकर, हवालदार हिरामण मारटकर,  कालेश पुपरेडीवार, पोलिस शिपाई  प्रभाकर नाईक, मोहन शिंदे, पोलीस शिपाई, पंडीत मुंडे, श्रीकांत दुर्गे, कविता एलमुले, प्रकाश गडकर,  जोगी मडावी,  प्रियंका तुलावी यांच्या पथकाने ४८ तासांत गुन्ह्याची उकल केली.

तिघांचे मिळून २६ हजार उसने

मयत संपत दुर्वा याच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजू तपासल्या. यात त्याच्याकडे गावातीलच तिघांचे पैसे उसणे होते, अशी माहिती समोर आली.  यातून त्यांच्यात वाद झाल्याची माहितीही मिळाली. हा धागा पकडून पोलिसांनी १९ मार्च रोजी तिघांना ताब्यात घेतले. आशिष कोरामी व सुखदेव मडावी यांचे प्रत्येकी सात हजार रुपये तर संजय कोरामी याचे १२ हजार रुपये उसणे होते. पैसे परत देत नसल्याने त्यांनी संपत दुर्वाला कट रचून संपविल्याचे निष्पन्न झाले.

पाळत ठेऊन काढला काटा

१७ मार्च रोजी संपत दुर्वा हे एटापल्लीतील काम आटोपून दुचाकीने गावी परतत होते. वाटेत एकरा फाटा येथे तिन्ही आरोपी पाळत ठेऊन होते. त्यांनी दुचाकी अडवून संपत दुर्वा यांना मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड मारला व नंतर गळा दाबून ठार केले. त्यानंतर आत्महत्या भासविण्यासाठी दोरीने मृतदेह रस्त्यापासून काही अंतरावर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *