मोटारसायकल अपघातानंतर ट्रक गेला अंगावर, एक ठार, चार जखमी

Uncategorized
Unique Multiservice
Share

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

कोरची, ता.७: दोन मोटारसायकलींची धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पाच जणांच्या अंगावरुन लोहखनिज भरलेला ट्रक गेल्याने एक महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बेळगावनजीकच्या कोसमी गावाजवळ घडली.

सेवाबाई रामसाय कोरेटी (३५), रा. दामेसरा, ता. कुरखेडा असे मृत महिलेचे, तर रमशिला दसरु काटेंगे (३६), रा. दोडके (छत्तीसगड), माणिक नरेटी (२५), रा. गोठणपार, ता. देवरी, जि. गोंदिया, दर्शना माणिक हलामी (२२) व सोनम मडावी (२४) अशी जखमींची नावे आहेत.

सेवाबाई कोरेटी व रमशिला काटेंगे या दोन बहिणी भाऊबिजेसाठी चिलमटोला येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या. आज कोरचीचा आठवडी बाजार असल्याने त्या माणिक नरेटी या नातेवाईक युवकासमवेत यांना घेऊन मोटारसायकलने येत होता. कोसमी गावाजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामुळे पाचही जण खाली पडले. एवढ्यात समोरुन सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज घेऊन येणारा सीजी ९७- एवाय १५३७ क्रमांकाच्या ट्रक त्यांच्या अंगावरुन गेला. या भीषण अपघातात सेवाबाई कोरेटी ही जागीच ठार झाली. उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, ट्रकचालक फरार आहे. या अपघातातील दर्शना हलामी यासुद्धा भाऊबिजेसाठी नांदळी या माहेरगावी गेल्या होत्या. आपल्या गावाकडे परतत असताना त्यांनाही अपघाताला सामोरे जावे लागले.

घटनेच्या वेळी कोरची येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले आमदार कृष्णा गजबे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींबद्दल विचारपूस केली आणि संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. दरम्यान, सुरजागड येथून लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीने मृत महिलेच्या आणि जखमींच्या परिवारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांनी केली आहे.

जिगरबाज पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील !

हा अपघातात ठार झालेल्या सेवाबाई कोरेटी हिचा मृतदेह छिन्नविछीन्न झाला. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पडले होते. माहिती मिळताच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उदय पाटील यांनी स्वतः मृतदेहाचे विखुरलेले तुकडे गोळा केले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये उदय पाटील यांच्या या जिगरबाज कार्याची चर्चा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *