गडचिरोली : अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत.
१८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन वधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविल्यास व त्यासाठी सोहळा पार पाडल्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती तसेच संबंधित वर वधू यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक व मित्रपरिवार, धार्मिक स्थळाचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, कॅटरिंग अशा सर्वांनी हा विवाह घडविल्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाही, जे अशा विवाहात सामील झाले त्या सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
बालविवाह होत असल्यास द्यावी माहितीपरिसरात बालविवाह होत असल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाइन १०९८ या नंबरवर कळवावी. नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.