पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती

Uncategorized
Unique Multiservice
Share

गडचिराेली : पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती. अशीच एक दुर्दैवी घटना देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथे मंगळवार १२ मार्च राेजी घडली. चारही मुलीच असलेल्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांची शवयात्रा मुलींनीच १३ मार्च राेजी आपल्या खांद्यावर वाहून नेली व अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.

देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथील बाबूराव मडावी हे रहिवासी. बाबूराव आणि केमाबाई या दाम्पत्याला उत्तरा, अनुताई, ललिता आणि निराशा आदी चार मुली आहेत. मडावी दाम्पत्याने आपल्या चारही मुलींना शिक्षित करून त्यांचे याेग्य संगाेपन केले. त्यांचे विवाहसुद्धा उरकले. त्यांची मोठी मुलगी उत्तरा काेडापे ही गडचिराेली तालुक्यातील अमिर्झा येथे, दुसरी मुलगी अणूबाई उईके जाेगीसाखरा, तिसरी मुलगी नलू आत्राम फरी येथे तर सर्वात लहान निराशा ही काेरेगाव येथे राहते. मडावी यांच्याकडे जेमतेम दीड एकर काेरडवाहू शेती आहे. याच शेतीच्या भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करीत हाेते. वृद्धत्वामुळे आजारपणात मुलीच त्यांचा सांभाळ करत होत्या. फरी येथील नलू आत्राम ही अधूनमधून त्यांची देखभाल करण्यासाठी येत असे. वृद्धापकाळामुळे १२ मार्च राेजी दुपारी १:३० वाजता बाबूराव यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी घरीच निधन झाले. बाबूराव यांना मुलगा नव्हता. त्यामुळे मुलींनीच अश्रूंना आवर घालून पार्थिवाला खांदा दिला. १३ मार्च राेजी सकाळी ११:३० वाजता धार्मिक रीतिरिवाजानुसार माती देऊन (मृतदेह गाडून) अंत्यसंस्कार पार पाडले.

बाबूराव मडावी व त्यांची पत्नी वृद्धत्वाकडे कललेल्या हाेत्या. त्यामुळे विविध आजार त्यांना बळावत हाेते. अशातच त्यांची प्रकृती बिघडली की मुली त्यांना आपल्या घरी नेऊन उपचार करायच्या किंवा वडिलांकडे राहुन शुश्रूषा करायच्या. फरी येथील मुलगी त्यांची देखभाल करायची

बाबूराव मडावी हे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद हाेते. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची हाेती. कुटुंबाला अंत्यविधीसाठी मदत व्हावी यासाठी संस्थेकडून आर्थिक मदत उपाध्यक्ष शेषराव कुमरे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे यांच्या हस्ते देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *