गडचिरोली : भरधाव दुचाकी झाडावर धडकून लिपिक जागीच ठार झाला. ही घटना आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे १६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली.
ईश्वर केवळराम करांकर (वय ४५,रा. पाथरगोटा ता. आरमोरी) असे मृताचे नाव आहे. ते वैरागड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात लिपिकपदावर कार्यरत होते. ते १६ मार्च रोजी दिवसभर शेतात होते. रात्री ११ वाजता दुचाकीवरुन मिरची व तुरीची गोणी दुचाकीला बांधून घरी जात होते. पाथरगोटापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला, त्यानंतर दुचाकी झाडावर आदळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.मृतदेह रात्रभर रस्त्यालगत पडूनदरम्यान, अपघातातमृत्यू झाल्यानंतर ईश्वर करांकर यांचा मृतदेह रात्रभर घटनास्थळीच पडून होता. १७ मार्च रोजी सकाळी रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना तो आढळला. त्यानंतर माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी धाव घेतली. पो.नि. विनोद रहांडगळे यांनी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.