गडचिरोली : तालुक्याच्या डोंगरगाव येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी नागरिकांनी गुरूवारी एकत्र येऊन दारू बंदीचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद न केल्यास विक्रेत्याची दारू नष्ट करणे, पोलिस कारवाई करणे, दारू विक्रेत्याच्या कुटुंबातील विवाह साेहळा, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रम व इतर कार्यक्रमात सहभागी न होणे, यासह विविध समारंभाला न जाण्याबाबत निर्णय घेण्यात आले.
डोंगरगाव येथे अनेक वर्षांपासून दारूविक्री बंद होती. परंतु मागील ३ ते ४ वर्षांपासून दारूविक्री पुन्हा सुरू झाली. परिणामी लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याने नागरिकांनी एकजूट हाेऊन दारूविक्री बंदीसाठी गाव संघटना गठित करून दारू बंदीचा प्रयत्न केला; परंतु काही दारू विक्रेते मुजोर असल्याने दारू विक्री सुरू राहिली. यावर निर्णय घेण्यासाठी गुरूवारी मुक्तिपथ व गाव संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. सोबतच गावातून रॅली काढून दारूविक्री बंद करण्याबाबत दारू विक्रेत्यांना तंबी देण्यात आली.ग्रामपंचायतकडून दाखलेही मिळणार नाहीत
डाेंगरगाव येथे दारूविक्री सुरूच ठेवल्यास विक्रेत्यांच्या शेती कामावर न जाणे, दारू विक्री बंद न केल्यास ग्रामपंचायतकडून मिळणारे कागदपत्र न देणे, असे कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांनतर रॅली काढून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले.सीमावर्ती भागातून दारूची वाहतूक
डाेंगरगावला लागूनच वैनगंगा नदी आहे. नदीपलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. येथे देशी-विदेशी दारू माेठ्या प्रमाणात उपलब्ध हाेते. त्यामुळे नदीतून चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जाते. या चाेरट्या वाहतुकीवर पाेलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.