कोरची दिनांक ८ /११/२०२४
श्री नंदकिशोर वैरागडे ,विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील नवनियुक्त प्राचार्य डॉ जयदेव देशमुख सर यांनी संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर यांच्या उपस्थितीत प्राचार्याचा पदभार स्वीकारला. आदर्श महाविद्यालय देसाईगंज, वडसा येथे मागील 32 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत होते. कार्यकारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही काळ सेवा केली असून संशोधन क्षेत्रातही त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विविध प्राधिकरणांवरही ते कार्य करीत आहेत.
यावेळी आयोजित पदग्रहण समारंभाचे अध्यक्ष म्हणून इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बाबासाहेब भातकुलकर हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व लिपिक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य जयदेव देशमुख यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर म्हणाले की, प्राचार्य आणि संस्था हे एका रथाचे दोन चाके आहेत. महाविद्यालयाला प्रगतीपथावर नेण्यासाठी या दोघांमध्ये समन्वय आवश्यक आहे. विद्यार्थी, पालक, कर्मचारी, संस्था व समाज या सर्वांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याची जबाबदारी प्राचार्यांना पेलावी लागते. म्हणून महाविद्यालयातील सर्व कर्मचार्यांनी आप आपली कामे जबाबदारीने पार पाडून प्राचार्यांना सहकार्य केले तर महाविद्यालय निश्चितच प्रगतीपथावर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य डॉ जयदेव देशमुख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्व कर्मचारी व संस्थेचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सर्व कर्मचारी यांनी महाविद्यालयाचे काम हे स्वतःचे खाजगी काम आहे असे समजून काम केले तर सर्व कामे चांगली होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रदिप चापले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. व्ही. टी. चहारे यांनी केले. यावेळी प्रा. आर एस रोटके, प्रा. सी एस मांडवे, प्रा. एस एस दोनाडकर, प्रा. एम डब्ल्यू रुखमोडे, प्रा समीर मिसार, प्रा. जी टी देशमुख, प्रा विनायक, प्रा वालदे, प्रा धिकोडी, प्रा फुंडे, प्रा. बनसोडे, मुख्य लिपिक आर डी पिलारे, श्री प्रकाश शेंन्डे, श्री तेजराम मडावी, श्री बालक साखरे, श्री प्रकाश मेश्राम व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.