चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

Uncategorized
Unique Multiservice
Share

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले.

जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव आहे. रियाज शब्बीर शेख (१४), जिशान फय्याज शेख (१५), लड्डू फय्याज शेख (१३, सर्व रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) हे बालंबाल बचावले. हे सर्व जण मिळून ३० नोव्हेंबरला दुपारी शहराजवळील बोरमाळा नदीघाटावर फिरण्यासाठी गेले होते. सोबत जिशान व लड्डू यांची आई ताजु शेख या देखील सोबत होत्या. वैनंगगा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे. पण पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मौजमजा म्हणून उतरलेली चारही मुले एकापाठोपाठ एक बुडाली. दरम्यान, यातील जयंत शेख यास जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. इतर तिघे जिल्हा रुग्णालयात उपचारास आल्याची नोंद नाही. या घटनेनंतर हनुमान वॉर्डातील तेली गल्लीत मोठी गर्दी झाली होती. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

हिंमत करून मातेने दोन मुलांसह तिघांचे वाचवले प्राणचारही मुले बुडाल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. नदीकाठावर असलेल्या ताजु फय्याज शेख यांनी धावत जाऊन पाण्यात उडी घेतली. हिंमत दाखवत त्यांनी एकटीने जिशान, लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज यास बाहेर काढले, पण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेल्या जयंत शेख यास वाचविण्यात त्यांना यश आले नाही. यावेळी मदतीसाठी काही मच्छीमार धावले. त्यांनी जयंत यास बाहेर काढले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. इतर तीन मुले सुखरूप वाचली.

जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून दुचाकीवरून नेला मृतदेहजयंत शेख याच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती कळवून शवविच्छेदन करण्याची तयारी केली. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २० ते २५ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून सुरक्षारक्षक, परिचारिकांशी हुज्जत घातली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो दुचाकीवरुन नेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *