
देसाईगंज वडसा – झाडीपट्टी नाट्य विकास मंडळ, देसाईगंज (वडसा) यांच्या वतीने सदर संमेलन आयोजित
वडसा – गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ( देसाईगंज) झाडीपट्टी नाटकंची कर्मभूमीत झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाच्या वतीने 5 वे झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रॅलीमध्ये विविध नाट्यसंस्थांचे कलाकार, सांस्कृतिक पथक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत निघालेल्या या रॅलीने शहराचे सांस्कृतिक वातावरण रंगून गेले.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम होते. तसेच उदघाटक म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री मा. आशिष जयस्वाल साहेब, प्रमुख अतिथी म्हणून हास्यसम्राट सिने भारत गणेशपुरे, माजी आमदार कृष्णा गजबे, प्राचार्य.ज्येष्ठ कलावंत के आत्माराम, पद्मश्री परशुराम खुणे उपस्थित होते.
यावेळी संमेलनाचे स्वागतध्यक्ष आमदार रामदास मसराम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नाट्यकलेचे समाजजागृतीत असलेले मोल अधोरेखित करताना ग्रामीण व झाडीपट्टी भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा नाट्यसंमेलनांचे महत्व अधोरेखित केले. नाटक या कलेद्वारे समाजातील वास्तव, समस्या व परिवर्तनाची प्रेरणा मिळते, असेही आमदार मसराम यांनी नमूद केले.
तसेच नाट्यसंमेलनात सहभागी कलाकारांना व संस्थांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, विविध नाट्यसंस्था, रसिक प्रेक्षक तसेच तरुणवर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाच्या या उपक्रमामुळे स्थानिक कलावंतांना नवी दिशा मिळून ग्रामीण भागात नाट्यसंस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

